१. पानगांव
हे गांव सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात बार्शी पासून ११ किमी अंतरावर आहे. गावची लोकसंख्या साधारणतः १५ च्या आंसपांस आहे. तेथील हवा निरोगी, कोरडी व आरोग्यदायक आहे. येथे ज्वारी, तुर हे पीक चांगले येते. पानगांव येथे दोन पावशांचे वाडे आहेत. काळाच्या ओघात वाड्यांची दुरावस्था होत आहे. वाड्यांचे तट अजूनही सुस्थितीत आहेत. येथील बरेचसे पानसे नोकरी निमित्त पुणे, बार्शी व इतर परगावी स्थायिक झाले आहेत.
"गोपाळकृष्ण मंदिर :"
हे मंदिर गावच्या मध्यभागी असलेल्या दर्शनी दरवाजाच्या दक्षिणेस आहे. पानसे यांचे हे खाजगी देवस्थान आहे. या देवळात अश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काकडा चालतो. गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. गोकुळ अष्टमीचा उत्सव हा सात दिवस असतो. या सप्ताहामध्ये भजन, किर्तन व अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मुळचे पानगांव येथील पण नोकरीनिमित्त परगावी असलेली पानसे मंडळी पानगांव येथे गोकुळ अष्टमीस नियमाने येतात. पुजेचे नित्यकाम श्री वासुदेव बाळकृष्ण दिक्षित पाहतात. मंदिरात मुर्ती काळ्या पाषाणाची असून शंखचक्रधारी आहे. शिवाय मुरलीही धारण केलेली आहे. मुर्ती अतिशय रेखीव व तेजःपुंज आहे. पानसे यांनी ही मुर्ती उत्तरेकडून आणली आहे. गोपाळकृष्णाच्या मुर्तीच्या उत्तरेस शुभ्र स्फटिकाच्या लक्ष्मीनारायणाच्या मुर्ती आहेत. नारायण चतुर्भुज शंख – चक्र – गदा – पद्मधारी असून त्यांच्या डाव्या बाजूस लक्ष्मीही आहे. ही मुर्तीही पानशांनी उत्तर भारतातून आणली. गोपाळकृष्ण मंदिराच्या गाभाऱ्याच्या पाठीमागे पानसे गुरूंची समाधी आहे. देवदर्शनानंतर या समाधीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे"खंडोबाचे देवालय :"हे देऊळ पानगांवच्या पुर्वेस खंडोबाच्या माळावर आहे. देवळास भव्य व उत्तुंग दीपमाळ आहे. शिवाजी खंडेराव पानसे यांनी इ.स. १७७७ मध्ये हे देऊळ बांधले, असा शिलालेख देवळात आहे. खंडोबाच्या मंदिरात तीन मुर्ती आहेत. त्या रेखीव नाहीत. पाषाणाच्या मुर्तीवर चांदीचे मुखवटे चढवलेले आहेत. खंडोबाची मुर्ती मध्यभागी असून त्याच्या उजव्या बाजूस सखी बाणाई व डाव्या बाजूस पत्नी म्हाळसाई आहे. चंपाषष्ठीस खंडोबाची यात्रा भरते. दुसऱ्या दिवशी देव गावातून येतो व छबिना निघतो. (पालखी पानसे यांचेकडेच आहे.) तिसऱ्या दिवशी गजे व कुस्त्या असतात. गावकरी वर्गण्या काढून ही यात्रा करतात. त्यात पानसे घराण्याचा सिंहाचा वाटा आहे.